Wednesday, April 26, 2006

तू कोण आहेस माझा?

आपल्या जवळजवळ प्रत्येक भेटीत तू मला तोच, एकमेव प्रश्‍न विचारतेस, "तू कोण आहेस माझा?' हा प्रश्‍न तू मला विचारलेला तर असतोच, पण तो तू स्वतःलाही विचारत असतेस. तुला उत्तर सापडेल, न सापडेल, माहिती नाही. पण मला मात्र उत्तर सापडलंय, नव्हे ते मी कष्टपूर्वक शोधलंय. तुला आजपर्यंत सांगितलं नाही, पण आता सांगतो. ऐक.... मनुष्यजन्म अतिदुर्लभ असतो म्हणतात. असं दुर्लभ भाग्य आपल्या दोघांच्या वाट्याला आलंय. अन्‌ दुधात साखर म्हणजे, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारं माणूस मला मिळालंय. त्याला अन्‌ त्याच्या प्रेमाला मला तितकंच काळजीपूर्वक जपून ठेवायचंय. इतकसंसुद्धा न दुखावता... शेवटी ही सगळी करामत नात्याचीच असते ना! एक पुरुष म्हणून मी सर्व रूपांतली नाती निभावणार आहे... "मग ? उद्याचा काय प्रोग्रॅम?' असं जेव्हा मी विचारेन तेव्हा ती चौकस चौकशी नसेल, तर मित्र या नात्याने उत्सुकतेपोटी विचारलेला, प्रॉंट उत्तराची अपेक्षा नसलेला एक साधासुधा प्रश्‍न असेल. एका संध्याकाळी मोगऱ्याच्या गच्च सुवासाचा गजरा तुझ्या ओंजळीत ठेवेन तेव्हा मी तुझा प्रियकरच असेन. समुद्रकाठी वाळूत मनसोक्त फिरून झाल्यानंतर शांतपणे, डोळे मिटून तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडेन तेव्हा तुझा व्रात्य तरीही प्रेमळ मुलगा असेन. क्वचित कधी तुला उशीर झाला अन्‌ मला म्हणालीस, "न्यायला ये ना रे.' तर तुला न्यायला येताना, माझ्या मनातल्या भावना एखाद्या मोठ्या भावाप्रमाणेच असतील. तुला मिळालेलं बक्षीस, ट्रॉफी दाखवशील, तेव्हा त्या ट्रॉफीसकट बक्षिसासकट तुला मिठीत घेऊन कपाळावर ओठ टेकवताना, पित्याचं वात्सल्य कसं असतं, हे माझं मलाच उमजेल. पहिल्या लाजऱ्याबुजऱ्या श्रावणसरीनंतर जेव्हा मी तुला विचारेन, "चल येतेस? मस्त भटकून येऊ दोन दिवस.' तेव्हा प्रेमाबरोबर मला मैत्रीचीदेखील ओढ असेल.. आणि जेव्हा तुझ्या हातचं सुग्रास जेवून तृप्ततेचा विडा खाताना, तुझ्या कामसू गोऱ्या हातात नाटकाची दोन तिकिटं ठेवेन तेव्हा, त्याक्षणी मी फक्त तुझ्या नवरा असेन. संपूर्णपणे नवरा. ही सर्व नाती एकाच जन्मात निभावताना माझा निभाव लागेल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न तर नक्कीच सच्चामुच्चा असेल. "माझ्यावर विश्‍वास ठेव' असं मी म्हणणार नाही, कारण तो आहेच... अगदी भरभक्कम आहे. त्यावरच तर ही नात्याची गुंफण होणार आहे. "फक्त तुझाच' हे नेहमी शेवटी येणारे शब्द माझ्या तोंडी नेहमी सर्वप्रथम असतील. कारण, उत्तरं शोधणाराच जाणतो राणी प्रश्‍नांची किंमत. आणि मौल्यवान प्रश्‍नांसाठी मौल्यवान उत्तरंच हुडकून काढतो.

4 comments:

Anonymous said...

Wow! Very touching! Your wife is one lucky lady! And you too, I guess :-)

Tulip said...

Beautiful thoughts xpressed in equally beautiful words!! It's a complete love. very rare to find indeed! May it last forever.

Devaki said...

very nice and very cute

Gabbar said...

Actually this not my own stuff. Got it as a forward. I liked it that's why posted here.